Centered Image

संघर्ष अभी रूका नहीं

26 जून 2006 ची संध्याकाळ. 
मुंबई शिक्षक मतदार संघातून पत्रकार असलेल्या कपिल पाटलांचा विजय झाला. मुंबईच्या शिक्षक मतदारसंघाचा चाळीस वर्षापासून राखलेला शिक्षक परिषदेचा गड पडला. सलग तीन टर्म आमदार असलेल्या श्रीमती संजीवनी रायकर मॅडमचा पराभव झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी मुंबईत पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाचे नवे पर्व सुरू झाले. शिक्षक भारती संघटनेला पहिल्याच प्रयत्नात आमदार कपिल पाटलांच्या स्वरूपात दमदार यश मिळाले. ऑगस्ट 2005 साली गुरुवर्य अशोक बेलसरे सरांनी रात्र शाळांचे शिलेदार आणि दिवसा शाळेतील निवडक शिक्षक सोबत घेऊन शिक्षक भारती संघटनेची स्थापना केली. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीद वाक्य घेऊन आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वात शिक्षक भारतीचे काम सुरू केले. सांज दिनांक, महानगर, आज दिनांक वृत्तपत्रातील पत्रकारिता, रात्र शाळा वाचविण्यासाठी काढलेल्या बॅटरी मोर्चातील सहभाग, डी एड बीएड कॉलेजमधील कॅपिटेशन फीच्या विरोधातील लढा, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षातील कामगिरीच्या जोरावर शिक्षक नसूनही आमदार कपिल पाटलांना मुंबईतील शिक्षकांनी आमदारकी दिली. विजयानंतरच्या आपल्या भाषणात कपिल पाटलांनी मुंबईतील शिक्षकांना दिलेलं वचन आज पर्यंत पाळले आहे. ते म्हणाले उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.

 

आपल्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार कपिल पाटील यांनी जोरदार कामगिरी केली. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा शिक्षक आमदार असतो हेच आम्हा शिक्षकांना माहित झाले ते केवळ आमदार कपिल पाटलांमुळे.

 

महिनाभर काम करूनही पगारासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईतील शिक्षक शिक्षकेतरांना महिन्याच्या एक तारखेला राष्ट्रीय बँकेतुन पगार सुरू झाला. महिला दिनी महिला शिक्षकांसाठी 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर केली. शिक्षकांना छळणारी आचारसंहिता रद्द केली. आर टी ई कायद्यानुसार पदवी धारण करणे बंधनकारक झाल्यानंतर हजारो शिक्षकांना यशवंतराव चव्हाण विद्यापीठामार्फत पदवी प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. अनुदानित शाळातील वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना बंद पडलेल्या तुकड्यांचे समायोजन करून शंभर टक्के पगार सुरू केला. रात्र शाळांचे भाडे माफ केले. रात्र शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून थकबाकी सह वेतन मिळवून दिले. 26 जुलैच्या पावसात वाहून गेलेल्या शाळांना एकही पैसा खर्च न करता नव्या इमारती मिळवून दिल्या. अध्यापनाच्या 45 तासिकांचा जीआर रद्द केला. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. राज्यातील वाडी वस्तीवर तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कायम करून पूर्ण पगार सुरु करणारा ऐतिहासिक लढा दिला.

 

शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी

शिक्षक आमदार असूनही आमदार कपिल पाटील यांनी नेहमीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांचा दर्जावाढिला प्राधान्य दिले. अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत या भावनेतून आपल्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच राज्यातील शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय बोर्डाप्रमाणे करण्याची मागणी केली. बिहार, केरळ व दिल्ली या तिन्ही राज्यात मुंबईतील शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक यांची टीम पाठवून शाळांच्या दर्जावाढिसंदर्भात राज्य शिक्षण विभागाला अहवाल पाठविला. आज आपल्या अभ्यासक्रमातील गणित आणि विज्ञान विषयात झालेला बदल हा त्याचा परिपाक आहे. मराठी विषयाची गोडी वाढावी व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे यासाठी त्यांनी स्कोरिंग मराठी परिषद घेतली. मुंबईत दहावी बारावीच्या परीक्षांचा टेन्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालं होतं. आत्महत्या थांबवाव्या यासाठी विख्यात मानसोपचारतज्ञ श्री.आनंद नाडकर्णी यांच्या मदतीने तणाव मुक्त विद्यार्थी अभियान सुरू केलं. दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं. दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना व शिक्षकांना आमदार चषक आणि भरघोस बक्षीसांनी सन्मानित केलं. शिक्षकांच्या पगारासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुदानित व्यवस्था असल्याचे ते ठामपणे सांगत होते. शाळांच्या भेटीदरम्यान एखाद्या शाळेत विद्यार्थी वर्गाबाहेर उभा असलेला दिसला तर शाळेच्या मुख्याध्यापकांशी व शिक्षकांशी चर्चा करून त्या मुलाला वर्गात पाठविण्याबाबत ते आग्रही असतात. शाळा म्हणजे संविधान शिकण्याचं केंद्र  ते मानतात. शाळांमध्ये देव देवतांची पूजा, सरस्वतीची पूजा, सत्यनारायणाची पूजा यावर आक्षेप घेतात. आपल्या सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. सावित्री फातिमाचा केवळ फोटो लावत नाही तर शिक्षक भारती संघटनेतील प्रत्येक सदस्याच्या मनात सावित्री फातिमाचा विचार पोहचविण्यासाठी धडपडणारे कपिल पाटील मी पाहत आलो आहे. हिंदी भाषा वगळण्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे विरोधात केलेले उपोषण असो कपिल पाटील न डगमगता ठाम भूमिका घेतात. माझी मते कमी होतील, सनातनी विचारांचे लोक विरोधात जातील याची कधीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी आणि पुरोगामी विचारसरणी हेच त्यांच्या हँट्रिकच्या यशाचं कारण असेल.

 

जनतेच्या प्रश्नांसाठी

मागील पंधरा वर्षात कपिल पाटलांनी केवळ शिक्षण क्षेत्रातील नव्हे अनेक सामाजिक प्रश्नांवर सभाग्रहात आणि सभागृहाबाहेर आवाज उठविला. खाजगी विद्यापीठ बिलाला आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला. विरोध करणारे ते एकमेव आमदार होते. अखेर सरकारला गरिबांसाठी आरक्षणाची तरतूद त्या करावी लागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिप्रेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याच्या निर्मितीमध्ये न्या. धर्माधिकारी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मुंबईच्या कोळीवाड्यांच्या प्रश्न, स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न, महाग होणाऱ्या म्हाडाच्या घरांचा प्रश्न, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, मानखुर्द येथील झोपडपट्टीतील पाणीप्रश्न, वाशी नाका परिसरातील कब्रस्तानचा प्रश्न या प्रत्येक ठिकाणी आमदार कपिल पाटलांना सोबत काम करताना लढायचं कसं? प्रश्नांना वाचा फोडायची कशी? हे आम्हा सर्वांना शिकता आलं. त्यांनी नेहमीच संघटनेचे नेतृत्व तरुणांना दिले.त्यातूनच शिक्षक भारती संघटनेची केवळ मुंबईतच नव्हे संपूर्ण राज्यभर अभेद्य अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. आज शिक्षक भारती संघटना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी पाय रोवून उभी आहे.

 

संघर्ष अभी रुका नही

सरकार कोणाचेही असो कपिल पाटलांना दोन हात करावेच लागतात. कारण कपिल पाटलांची बांधिलकी कोणत्या पक्षाशी नाही तर ती सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाशी आहे. समानतेशी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते अनेकदा एकटे पडतात. मोठ मोठ्या राजकीय संधींना मुकतात. पण लढत राहतात. वर्सोवा येथे म्हाडा सोसायटीतील आमदारांना मिळणारा फ्लॅट नाकारताना अथवा नितीश कुमार यांच्या गटात राहून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणारा समावेश नाकारताना आमदार कपिल पाटील एका क्षणात निर्णय घेतात. तत्त्वांशी तडजोड न करता नकार देतात. ही मोठी गोष्ट आहे. भलेभले समोर आलेल्या संधी मिळवण्यासाठी तडजोडी करतात, भूमिका बदलतात, लोटांगण घालायला तयार होतात. पण आमदार कपिल पाटील या सर्व परिस्थितीत ताठ कण्याने उभे राहतात. हे चित्र आज दुर्मिळ झाले आहे.

 

सध्य परिस्थितीत कोरोनामुळे शिक्षण आणि शिक्षकांवर मोठे संकट ओढवले आहे. एक तारखेला पगार मिळत नाही. शाळेत उपस्थिती बंधनकारक आहे पण रेल्वेची परवानगी नाही. पेन्शनचा प्रश्न बिकट बनला आहे. टप्पा अनुदानासाठी झगडावे लागत आहे. 12 वर्षे व 24 वर्षाची श्रेणीलाभ मिळत नाही. रात्र शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसेंदिवस प्रश्न वाढत आहे.  कपिल पाटलांचा लढा थांबलेला नाही. शिक्षणमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे शासन दरबारी कोरोना कालावधीतही सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक भारती, मुंबईतील सर्व शिक्षक त्यांच्या प्रत्येक लढयात सोबत उभे आहेत. मला खात्री आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आमदार कपिल पाटील मात केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

 

सुभाष किसन मोरे

कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य 

 

#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील 

#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष

About Us


Welcome to Shikshak Bharati At Shikshak Bharati, we stand as a beacon for teacher's rights, embodying unwavering dedication to ensuring the well-being and empowerment of educators nationwide. Renowned as one...
Read More